डोनाल्ड ट्रम्प खोटारडे- अमेरिकेच्या मीडियाने केली पोलखोल

44

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीर प्रश्नावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्यास आपण तयार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी आपल्याकडे मदत मागितल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. तर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्याबरोबर मोदींचे असे बोलणेच झाले नसल्याचे स्पष्ट केले. यावर अमेरिकेच्या मीडियाने ट्रम्प यांना लक्ष्य केलं असून त्यांना थापा मारण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प 10 हजार 796 वेळा खोटं बोलले. तसेच ते दिवसाला 12 वेळा तरी खोट बोलतातं, असे अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी कश्मीर प्रश्नी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावण्याची ट्रम्प यांनी तयारी दर्शवली. याचदरम्यान मोदी यांनीही आपल्याकडे कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदतीची अपेक्षा केल्याचे त्यांनी म्टहले. पण इमरान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ट्रम्प यांनी कश्मीरवर केलेल्या विधानाचा उल्लेखही नव्हता. त्यातच हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही मोदी यांचे ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले. कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होऊ शकते. यात तिसऱ्या पार्टीला हस्तक्षेप करू देणार नाही असे ठणकावून सांगत कश्मीर मुद्द्यावर हिंदुस्थान आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे अधोरेखित केले. यामुळे ट्र्म्प यांचे बिंग फुटले ते थापा मारत असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर अमेरिकेच्या वॉशिंगटन पोस्ट या वृत्तपत्रानेही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प खोट बोलत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत ते 10 हजार 796 वेळा खोट बोलल्याचा लेखाजोगाच मांडला. तसेच ते दिवसातून 12 वेळा खोट बोलतातं असेही म्हटले. या वृत्तपत्राच्या फॅक्ट चेकर्स डेटाबेसने ही माहिती दिल्याने ट्रम्प यांची पोलखोल झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या