
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडीयाच्या विमानात मर्यादेपेक्षा जास्त मद्य देण्यास क्रू मेंबर्सने नकार दिल्याने एका परदेशी महिलेने धिंगाणा घातल्याची घटना शनिवारी घ़डली. या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे. ही महिला आर्यलँडची असून ती व्यवसायाने वकील आहे. दरम्यान, याप्रकरणी एअर इंडीयाने अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या महिलेने हवाईसुंदरीकडे मद्याची मागणी केली होती. विमान प्रवासात प्रवाशांना मर्यादित प्रमाणातच मद्य दिले जाते. पण ही महिला सतत मद्याची मागणी करत असल्याने क्रू मेंबर्सने दिलगिरी व्यक्त करत तिला मद्य देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या महिलेने क्रू मेंबर्सला शिव्या घालायला सुरूवात केली. एवढ्यावरच ती थांबली नाही. तर ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहप्रवाशाच्या अंगावरही धावून गेली. ही घटना एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.






























































