सफाई कामगार कल्याण मंडळ स्थापन करा, कामगार संघटनांची कामगार मंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील असंघटित सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण नाही. त्यामुळे माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर असंघटित सफाई कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल, भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, अखिल भारतीय बांधकाम जनरल कामगार युनियन यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नावर सफाई कामगारांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. यामध्ये सफाई कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी, किमान वेतनामध्ये सुधारणा करावी अशी मागणी केली. यावेळी याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. सफाई काम हे 365 दिवस चालणारे काम असल्याने या कामातील ठेकेदारी प्रथा बंद करावी. याबाबत विधी विभागाचे अभिप्राय घेऊन त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी वेतन थकवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईच्या डोंगरी येथील हबीब रुग्णालयातील कामगारांना विना नोटीस कोविड कालावधीत कामावरून कमी केले होते त्यांची सुनावणी घेण्याचे व धर्मादाय आयुक्त कार्यालयाला शासन स्तरावर तक्रार करण्याचे आश्वासन मुश्रीफांनी दिले. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र गोविंदभाई परमार, सचिव एस. लीना डिसोझा, मुंबई उपाध्यक्ष नावीनचंद्र मकवाना, सचिव जितू रोझ उपस्थित होते.