डिप्रेशन

>> शिरीष कणेकर

मी ज्या घरात राहत होतो (व जिथून मी लवकरच बाहेर पडण्याची शक्यता होती) तिथं मला भेटायला एक पूर्णपणे अनोळखी दूरदूरच्या नात्यातली व्यक्ती आली. (ओळखदेख नसताना डायरेक्ट गाढव कसं म्हणणार? त्यातून तो माणसासारखा दिसत व बोलत होता.)

‘‘मी मुद्दाम तुम्हालाच भेटायला आलोय’’ तो म्हणाला. यापूर्वी मला कोणी अहो-जाहो केलेलं नसल्यानं मी पुरेसा प्रभावित झालो. आता काही काळ तरी चांगुलपणाचा सौम्य मुखवटा घालणं मला भाग होतं. नाहीतर तो – आय मीन ते – अहोजाहोवरून शिवीगाळीवर उतरला असता. अर्थात मीही त्यात वाकबगार होतोच. पण चोवीस तास तलवार उपसून जगणं बरोबर आहे का? पेशवाईत बापू गोखले नावाचा तलवारबहाद्दर मनसबदार होता. एकदा पेशव्यांनी जंगी खाना दिला. सर्व सरदारांना सपत्नीक निमंत्रण होतं. अविवाहित गोखल्यांचा शेजारचा पाट रिकामा होता. कोणीतरी चेष्टेनं बापू गोखलेंना विचारले, ‘‘काय बापूराव, बायको कुठंय?’’ क्षणाचाही विलंब न लावता बापूंनी कमरेची तलवार उपसून शेजारच्या पाटावर ठेवली.

हा किस्सा ऐकल्यावर मी नाटक कंपन्यांना सामान पुरवणाऱया एका कंपनीकडून तलवार आणली होती. पण या ‘बुफे’च्या जमान्यात पंक्ती बसतात कुठे? त्यातून बायको शेजारच्या पाटावर बसली तर तलवारीनं जायचं कुठं? ‘स्पिरिट’ दाखवायला व देहावर तलवार बाळगायला बापू गोखलेंना बायकोचा अडसर नव्हता. सलमान, राहुल गांधी हे तलवारीचा माज दाखवू शकतात. डझनभर पोरं असलेला तलवार कशी मिरवणार? आजही काही काढायला मी माळय़ावर चढलो की ती गंजलेली तलवार मला दिसते व आपण बापू गोखलेच नव्हे तर विक्रम गोखलेही होऊ शकत नाही ही खंत उरी दाटून येते. मग मी बोलताना जीवघेणे ‘पॉज’ घेऊन वेळ मारून नेतो. असो.

‘‘मी तुमच्याविषयी बरंच ऐकलंय’’ तो शुष्क ओठांवरून (स्वतःच्या) जीभ फिरवत म्हणाला. एफ.वाय. सायन्सला मला फॉर्म मिळाला नव्हता या पलीकडे माझ्याविषयी ऐकण्यासारखं काय होतं? बापरे, म्हणजे तो अभ्यासाविषयी माझं बौद्धिक घ्यायला आला होता की काय?
‘‘तुम्ही म्हणे कमालीचे मितभाषी आहात. दिवस-दिवस तुमच्या तोंडून शब्दही निघत नाही. सगळं मनात दाबून ठेवता. कुढत बसणं चांगलं नाही. त्यानं तुमच्या प्रकृतीवर परिणाम होतो.’’

मी आ वासला. तो नक्की कोणाविषयी बोलत होता? चुकून वेगळय़ा घरात तर घुसला नव्हता?
‘‘तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये गेलायत. ते वाढून व वेळीच उपचार न केल्यानं तुम्ही आता मनोरुग्ण होण्याच्या मार्गावर आहात.’’ तो मृत्युदंड ठोठावणाऱया न्यायाधीशाच्या गांभीर्यानं म्हणाला. मी आधीच आ वासलेला असल्यानं मला पुन्हा व जास्त आ कसा वासायचा हेच कळेना. मी नुसताच त्याच्याकडे बघत बसलो. यालाच तो ‘डिप्रेशन’ व मनोविकार म्हणत असेल काय?

माझ्या पुढे दोन पर्याय होते. मी असाच ‘डिप्रेशन’चा अभिनय करत बसलो असतो तर माझ्या ‘इमेज’चे तीनतेरा वाजले असते आणि मी नेहमी बोलतो तसं काही बोललो असतो तर त्या अनामिक, अनाहुत, आगंतुक हिंतचिंतकाच्या जिवाचं काही बरंवाईट झालं असतं. म्हटलं घरात मुडदा नको. ‘मुखदुर्बल माणूस पोपटासारखा बोलायला लागल्याचे पाहून एका माणसाचं निधन’ असे पेपरातील मथळे माझ्या डोळय़ांसमोरून सरकले. त्याचा जीव माझ्या हातात होता हे त्याच्या गावी नव्हतं. मनोरुग्णानं मनात आणलं असतं तर त्याची मुंडी पिरगळली असती. पण त्या दिवशी का कोण जाणे, मी क्षमाशील मूडमध्ये होतो. त्या दिवशी मला नापास करणाऱया मास्तरडय़ालाही मी क्षमा केली असती व घरकामाला ठेवलं असतं.
‘‘तुम्ही या अवस्थेतून प्रयत्नपूर्वक बाहेर यायला हवं. मौन सोडा. पाळीव प्राण्यांशी बोललात तरी चालेल.’’
‘‘गाढवाशी चालेल?’’
‘‘गाढव पाळीव प्राणी नाही पण तरी चालेल. इथे गाढव कुठं असतं?’’
‘‘बाहेरून येतं.’’
‘‘घरात?’’
‘‘हो.’’
‘‘आश्चर्य म्हटलं पाहिजे.’’
‘‘आश्चर्य काय त्यात? दारावरची बेल दाबून येतं. तुम्ही आलात नं, अगदी तस्सं.’’
एकदम स्वनियुक्त मानसरोगतज्ञ उठला व काहीतरी पुटपुटत बाहेर पडला. ‘डिप्रेशन’मध्ये वाटला. असंच माझ्याशी बोलत बसला असता तर त्याचा मनोविकार बळावला असता. त्याला माझी आठवण राहील असं काहीतरी मला करायलाच हवं होतं.
मी धावत गच्चीत गेलो. गच्चीच्या दाराला टेकू म्हणून लावून ठेवलेला अणुकुचीदार दगड मी वरून नेम धरून माझ्या पाहुण्याच्या टकुऱयात मारला. त्याला लग्नाची मुलगी तर नसेल? आणि असेल आणि ती दिसण्या-वागण्यात बापावर गेली असेल तर? …अरे देवा!
तो मला कधीही पुन्हा दिसला नाही. ‘डिप्रेशन’, ‘मौन’, ‘मनोरुग्ण’ हे शब्दही माझ्या आयुष्यात डोकावले नाहीत. गाढवांशी बोलणंही मी टाळत राहिलो.
माझ्या दगडानं आपलं काम चोख बजावलं असेल का?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या