
पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघा, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात महाराष्ट्राच्या पुढे असल्याचीच आज कबुली दिली. लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांचे गुजरातप्रेम उफाळून आल्याचेही यावेळी पाहावयास मिळाले.
गुजरात हा काही पाकिस्तान नाही. तो महाराष्ट्राचा लहान भाऊच आहे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती एकाच दिवशी झाली, असे फडणवीस म्हणाले. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प आणि वाढवण बंदर प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध आहे. मात्र आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प आणणारच, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. एखादा अधिकारी सरकारी निर्णयाची अंमलबजावणी करणार नसेल तर त्याला थेट घरी पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला.































































