
विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपमध्ये असंतोष खदखदत असून पक्षांतर्गत नाराजांनी राज्यातील भाजप नेतृत्वात बदल करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. गुरुवारी गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले अशी बचावात्मक भूमिका घेतली आहे.
आपल्याला कोणी डोईजड होऊ नये म्हणून खडसे, तावडे, महेता यांच्यासारख्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. एवढेच नाही तर माजी मंत्री पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांच्यासारख्या उमेदवारांचा जाणीवपूर्वक पराभव राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने केल्याची खदखद भाजपमध्ये आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचा आरोप जाहीरपणे केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी गोपीनाथ गडाकरून खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
खडसे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते. खडसे, मेहता आदी नेत्यांची तिकीट राज्यातील नेतृत्वाने कापलेली नाहीत. राज्याने थेट शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. केंद्रीय संसदीय मंडळाने कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी खडसे उमेदवारी नाकारण्याशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.
मनातील खदखद योग्य ठिकाणी मांडा
नाथाभाऊ अनेकदा त्यांच्या मनात नसत ते बोलून जातात. मात्र यामुळे त्यांच नुकसान होते. कुणाच्या मनात जर काही खदखद असेल तर ती योग्य ठिकाणी मांडली पाहिजे.
भाजप ओबीसींचाच पक्ष
भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झाल तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये. आमच्या काळात जे ओबीसी आमदार मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले, असे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्याबाबत आदर
पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेक्हा टार्गेट केले गेले तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच उभा राहिलो. माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहे. भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत, असे फडणवीस म्हणाले.

























































