चालक व वाहकाने घडविले प्रमाणिकपणाचे दर्शन, सापडलेले हजारो रुपये केले परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख आगारातील चालक ए. एम. पाटील व वाहक टी. सी. शेख यांनी बसमध्ये प्रवाशाचे सापडलेले सतरा हजार पन्नास रुपयांचे पाकीट व त्यामधील कागदपत्रे देवरुख आगारात जमा करुन प्रमाणिकपणाचे दर्शन घडवले.

देवरुख आगाराची साखरपा-अर्नाळा या बसमध्ये नालासोपारा येथे स्थायिक असणा-या प्रवाशाचे सतरा हजार पन्नास रुपयांचे पाकीट विसरले होते. या पाकिटात पैशांसह एटीएम कार्ड, चार चाकीचा परवाना, नवीन आलेले आर.सी. कार्ड व पोलीस स्टेशनमधील एफआयआरची छायांकित प्रत होते. हे पाकीट वाहक टी.सी.शेख यांना बस चेक करीत असताना सापडले. ती गोष्ट त्यांनी चालक ए.एम. पाटील यांना सांगितली व नंतर या दोघांनी याबाबत कोणतीही लालसा न दाखविता ते पाकीट देवरुख आगारात जमा केले. तसेच प्रवाशांस संपर्क साधून बसमध्ये पाकीट सापडल्याचे कळविले.