
राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आता दोन ट्विस्ट आले आहेत. रेणू शर्मा हिने आपल्यालाही जाळय़ात ओढले होते, असा आरोप भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे आणि तशी तक्रारही अंबोली पोलीस ठाण्यात दिली आहे. हेगडे यांच्यापाठोपाठ मनसेचे मनीष धुरी यांनीही रेणू शर्मा ही माझ्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती असा दावा केला आहे. महाराष्ट्रतील राजकारण्यांसाठी लावलेल्या या हनी ट्रॅपमुळे एकच सनसनाटी निर्माण झाली आहे.
रेणू शर्मा हिच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर सविस्तर खुलासाही केला. मात्र त्यानंतरही राजकीय खळबळ कमी झालेली नाही. आरोप-प्रत्यारोप होतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. ही धावपळ सुरू असतानाच भाजपचे कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा राजकारण्यांना कसे ‘टार्गेट’ करते याची तक्रार पोलिसांत दिली आणि या प्रकरणात नवे ट्विस्ट आले. पाठोपाठ मनीष धुरीही मीडियासमोर आले.
धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱया महिलेने कुठून तरी माझा नंबर मिळवला आणि ती मला फॉलो करत होती, असे धुरी यांनी सांगितले. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. चौकशी केली असता ती महिला मोठमोठय़ा लोकांना हेरायचा प्रयत्न करत असल्याचे कळले म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पैसे उकळण्याच्या उद्देशाने 2018-19 मध्ये ही महिला पुन्हा माझ्या संपका&त आली. मीही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. या महिलेविरोधात आपणही तक्रार दाखल करणार असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर जेट एअरवेजचे माजी अधिकारी रिजवान पुरेशी यांनीही रेणू शर्मा हिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.
कृष्णा हेगडे काय म्हणाले
- आता 6 आणि 7 जानेवारीला मला तिने ‘आप मुझे भुल गये क्या’ असे पुन्हा मेसेज केले. त्यावर मी काही प्रतिसाद दिला नाही.
- रेणू शर्मा ही महिला 2010पासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी माझ्या मागे लागली होती.
- वेगवेगळ्या मोबाईल व लँडलाइन क्रमांकावरून तिने मला कॉल केले. मी माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले.
- आज तिने मुंडे यांना लक्ष्य केले. हीच वेळ माझ्यावर आली असती. उद्या कदाचित दुसरा कोणी त्या जागी असेल.
- धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत, पण ही महिला कुणालाही टार्गेट करू शकते म्हणून मी तक्रार दाखल करून पोलिसांना माहिती दिली आहे.
पक्ष निर्णय घेईल – पवार

धनंजय मुंडेंवरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. त्यांनी स्वतः यासंदर्भात माझी भेट घेऊन माहिती दिली. पक्षाच्या नेत्यांसमोर हा विषय मांडून चर्चा केल्यानंतर यासंदर्भातील निर्णय पक्ष घेईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरून व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.
आरोपाचे स्वरूप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱयांना सांगणे माझे कर्तव्य आहे. त्यांचे मत घेऊन पुढील पावले टाकली जातील. याप्रकरणी विलंब व्हावा असे वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले.
नो कमेंट
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बुधवारी रात्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित जनता दरबारासाठी उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी ते आले असता त्यांनी ‘नो कमेंट’ असे म्हणत मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास नकार दिला. मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिले आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे ते मी प्रेस नोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिले असल्याचे सांगितले.































































