
सामना प्रतिनिधी। धाराशिव
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जुगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून शनिवार, 8 डिसेंबर रोजी 14 जुगार अड्ड्यावर धाडी टाकण्यात आली. यामध्ये 2 लाख, 64 हजार 725 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 40 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक आर. राजा धाराशिव येथे रुजू झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जुगार अड्डे तसेच अवैध दारु विक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मुद्देमालही जप्त करण्यात येत आहे.
शनिवार, 8 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तब्बल 14 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये सुमारे 2 लाख 64 हजार 725 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 40 जणांविरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील पोलीस लाईनसमोर शिफा पानस्टॉलच्या मागे विशेष पोलीस पथकाने धाड टाकून 30 हजार 105 रु., शहरातील इंदिरानगर भागात धाड टाकून 8 हजार 200, शहरातील शिवाजी चौक भागातील चपडे व्हिडीओ सेंटर येथून 410 रु., जमजम मटन शॉपजवळ धाड टाकून 9 हजार 210, गॅलक्सी पान स्टॉलजवळून 3 हजार 920, देशी दारु दुकानाजवळून 10 हजार 130, नाट्यगृहाशेजारी एका टपरीमधून 1 हजार 200, लकी पान स्टॉल मधून 1 हजार 690, चौरे जनरल स्टोअर्सच्या बाजूला 16 हजार 370, हॉटेल तुळजाई येथून 1 लाख 74 हजार 540, इंदिरा नगर येथे धाड टाकून 1 हजार 500 रुपये, तुळजापूर तालुक्यातील काव्रंबा येथील ग्रामपंचायत कार्यालया बाजूला 460 रुपये तसेच नळदुर्ग येथील बागवान गल्ली येथे धाड टाकून 4 हजार 750 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने काल टाकण्यात आलेल्या 14 धाडी पैकी 12 धाडी या धाराशिव शहरात टाकण्यात आल्या आहेत. यावरुन धाराशिव शहरासह जिल्ह्यात मटका, जुगार किती मोठ्या प्रमाणावर चालतो आहे, याचा अंदाज येईल.






























































