ओप्पो! धोनीचा चिनी कंपनीशी करार, देशवासीयांनी व्यक्त केला संताप

हिंदुस्थान – चीन यांच्यामध्ये सीमाप्रश्नावरून वाद निर्माण झाला असून हिंदुस्थानात चीनविरोधी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानात चिनी वस्तूंकर बहिष्कार घालण्यात आला असून त्यांच्या ऍप्सवरही बंदी लादण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ओप्पो या चिनी कंपनीसोबत करार केला आहे. क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया तसेच हिंदुस्थानच्या संरक्षण दलावर प्रेम करणाऱया महेंद्रसिंग धोनीने ओप्पोसोबत केलेल्या हातमिळवणीनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्या देशाने भरभरून दिले, त्या देशाविरोधात जाण्याचा विचार तरी मनामध्ये कसा आला? ही कसली देशभक्ती? असा सवाल देशवासीयांकडून यावेळी करण्यात आला असून महेंद्रसिंग धोनीने देशापेक्षा पैशांना प्राधान्य दिले आहे असा सूरही उमटू लागला आहे.

आयपीएलचे औचित्य साधले

ओप्पो कंपनीने आयपीएलचे औचित्य साधून महेंद्रसिंग धोनीसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आयपीएलला मिळणारा दणदणीत प्रतिसाद पाहून या स्पर्धेच्या माध्यमातून ओप्पो कंपनी आपला महसूल वाढवण्यावर जोर देत आहे.

टेक्नॉलॉजीत सातत्याने नावीन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या ओप्पोसोबत जोडला गेल्याने आनंदी आहे. आता ओप्पोसोबत काम करताना आवडीच्या गोष्टींसाठी मर्यादा वाढवणाऱया व्यक्तींना प्रेरणा देण्याचे ध्येय बाळगले आहे. या प्रोजेक्टचा एक भाग होता आल्यामुळे मी उत्साही आहे. – महेंद्रसिंग धोनी 

पैसा मोठा की देश, सचिनही रडार

चीनशी संबंधित असलेली कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी भारतरत्न सचिन तेंडुलकरची निवड झाल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीनंतर कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (कॅट) सचिन तेंडुलकरला विरोध दर्शवण्यात आला आहे. देश मोठा की पैसा याचे उत्तर सचिन तेंडुलकरने द्यायला हवे. त्या कंपनीसोबतचा करार मोडून टाकायला हवा. याबाबतचे पत्र आम्ही त्याला लिहले असून येत्या रविवारपर्यंत उत्तराची प्रतीक्षा केली जाईल. अन्यथा पुढल्या आठवडय़ात आंदोलन केले जाईल. अशी भूमिका कॅटकडून यावेळी घेण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या