खेडमध्ये लवकरच डायलेसिस सेन्टर सुरु करणार; पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

खेड दापोली व मंडणगड या तिन्ही तालुक्यात कुठेही डायलेसिस सेन्टर नसल्याने या तालुक्यातील किडनी त्रस्त रुग्णांना चिपळूण किंवा डेरवण येथे जावे लागते. या मध्ये वेळ आणि पैशाचाही अपव्यय होतो मात्र आता या तिन्ही तालुक्यातील किडनी त्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच डायलेसीस सेन्टर सुरू केले जाणार असल्याने किडनीत्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अलीकडच्या काळात किडनी त्रस्त रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. ज्यांच्या दोन्ही किडन्या कोणत्या ना कोणत्या कारणाने निकामी झाल्या आहेत त्यांना डायलेसिस शिवाय पर्याय उरलेला नाही.. खेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यामध्ये डायलेसिसची आवश्यकता असलेले अनेक रुग्ण आहेत. मात्र या तिन्ही तालुक्यात डायलेसिस सेंटर नसल्याने या रुग्णांची फारच गैरसोय होते. काही जणांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलेसिस करावे लागते. या रुग्णांना महिन्याभरात दहा ते 12 वेळा चिपळूण किंवा डेरवण येथे जावे लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होतोच परंतु त्याचबरोबर प्रवास भाड्याच्या दृष्टीने आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागतो.

खेड दापोली व मंडणगड तालुक्यातील किडनी त्रस्त रुग्णांची होणारी गैरसोय लक्ष्यात घेऊन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गालगत कळम्बनी येथे असलेल्या उप जिल्हा रुग्णलयात लवकरच शासकीय डायलेसिस सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांच्या या निर्णयामुळे खेड दापोली मंडणगड या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांसह रायगड जिल्ह्यातील रुग्णांचीही गैरसोय दूर होणार आहे. ज्या रुग्णांना आयुष्यभर डायलेसिस ची गरज असते त्यांना फिस्तुला नामक ऑपरेशन करावे लागते. मात्र हि सुविधा चिपळूण किंवा डेरवण येथे उपलब्ध नसल्याने या ऑपरेशनसाठी कोल्हापूर किंवा मुंबई गाठावी लागते. रुग्णांची ही गैरसोयही दूर व्हावी यासाठी डायलेसिस सेंटर बरोबरच कळम्बनी उप जिल्हा रुग्णालयात फिस्तुला ऑपरेशनची सुविधा उपलब्ध झाल्यास किडनी आजार ग्रस्त रुग्णांचा पैसा आणि वेळही वाचणार आहे.