सात वर्षांत 50 हजार रुग्णांचे डायलिसिस; प्रबोधन धर्मादाय डायलिसिस सेंटरचा सेवाभावी उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रबोधन धर्मादाय डायलिसिस सेंटरला 1 ऑक्टोबर रोजी सात वर्षे पूर्ण झाली. या डायलिसिस सेंटरमध्ये सध्या 15 मशीन्स असून त्यावर आतापर्यंत 50 हजार रुग्णांचे नाममात्र दरात तर काही रुग्णांना विनामूल्य डायलिसिस करण्यात आले आहे. सध्या येथे 60 रुग्ण डायलिसिसची सेवा घेत आहेत.

तब्बल 50 हजार डायलिसिसचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते येथील कर्मचारी ज्यांनी कोरोना काळातसुद्धा कायम हजर राहून रुग्णांना अव्याहत सेवा दिली त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेश कुमार व या सेंटरचे प्रकल्पप्रमुख व प्रबोधन संस्थेचे प्रमुख कार्यवाह  सुनील वेलणकर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी रुग्णांनी येथे उच्च दर्जाची सेवा मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रुग्ण, डॉक्टर्स, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष गोविंद गावडे, सदस्य महेश करमरकर व देणगीदार उपस्थित होते.