आकस्मिक स्पेस-वॉक!

khagoldilip@gmail.com

अंतराळयात्री म्हणून यश मिळवलेल्या अनेक महिलांनी त्या त्या वेळी ‘स्पेस फ्लाइट’मध्ये विशेष कार्य केल्याचं लक्षात येईल. पूर्वायुष्यात वेगळं शिक्षण घेतलेल्या, परंतु ‘नासा’च्या संपर्कात आल्यानंतर अंतराळ प्रवासाचं आव्हान स्वीकारणाऱ्या या महिला अंतराळ संशोधकांनी पृथ्वी आणि अंतराळाचं नातं अधिक घट्ट केल्याचं आढळेल.

यापैकीच एक म्हणजे मार्गारेट सेडन. स्पेस मिशन तज्ञ म्हणून सेडन यांना तीन वेळा अंतराळात जाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं.

अमेरिकेतील टेनिसी राज्यात जन्मलेल्या सेडन यांनी पदवी घेतली ती शरीर विज्ञानात. कॅलिफोर्नियातून पदवीधर झाल्यानंतर ‘टेनिसी कॉलेज ऑफ मेडिसिन’मधून त्यांनी वैद्यक शास्त्रातील डॉक्टरेट प्राप्त केली. डॉक्टर म्हणून शल्यक्रिया करण्याचा तीन वर्षांचा विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला. ऑपरेशन झालेल्या रुग्णांचा आहार कसा असावा याविषयी त्यांचा सखोल अभ्यास होता.

१९७८ मध्ये त्यांची ‘नासा’तर्फे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आणि पुढच्याच वर्षी ‘अंतराळयात्री’ होण्याची क्षमता त्यांनी मिळवली. १९८५ मध्ये ‘डिस्कव्हरी’ यानातून अंतराळयात्रेची संधी मिळाल्यावर अंतराळातील विविध प्रयोगांसाठी डॉ. सेडन सज्ज झाल्या. या यानाने सोडलेल्या सिन्कॉम या उपग्रहाची ‘प्रकृती’ बिघडल्याने या तंत्रज्ञ  डॉक्टरबाईंना अचानकपणे यानाबाहेर ‘स्पेस वॉक’ करण्याची वेळ आली. ही जोखीम त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

त्यानंतर १९९१ मध्ये ‘कोलम्बिया’ यानावर आरूढ होऊन त्यांची अंतराळयात्रा सुरू झाली. यावेळच्या नऊ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात त्यांनी सहकारी अंतराळतज्ञांसह विशेष प्रयोग करून अंतराळात नेलेल्या सजीव सूक्ष्म पेशींपासून प्राणी अथवा माणसांवर अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो आणि पुन्हा पृथ्वीवर परतल्यावर कोणते बदल जाणवतात याचं वैद्यकीय दृष्टीने निरीक्षण केले. या काळात पृथ्वीभोवती १४६ परिक्रमा पूर्ण करून या अंतराळ पथकाने २१८ तास अंतराळाचा अनुभव घेतला.

१९९३ मध्ये डॉक्टर सेडन यांना तिसऱ्यांदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली. या चौदा दिवसांच्या प्रवासात त्या ‘स्पेसलॅब’च्या ‘पे-लोड’ कमांडर होत्या. सातजणांच्या सहाय्याने डॉ. सेडन यांनी न्यूरोवेस्टिब्युलर, कार्डिओवेस्क्युलर तसेच मानवी शरीरातील चयापचयावर अंतराळात काय परिणाम होतो यावर स्वतः आणि सहकाऱ्यांच्या चाचणीतून निष्कर्ष नोंदवले. याच ‘फ्लाइट’मध्ये नेलेल्या ४८ उंदरांवरही असेच प्रयोग करून वजनरहित अवस्थेला सजीवांच्या शरीरसंस्था कसा प्रतिसाद देतात याची निरीक्षणं नोंदवली. प्राण्यांच्या ‘वागणुकीत’ अंतराळात काही बदल घडतात का याचीही सूक्ष्म नोंद करायची होतीच.

अशा एकूण तीन अंतराळ यात्रांमध्ये एकूण ७२२ तासांचा अंतराळानुभव मार्गारेट सेडन यांनी घेतला. त्या डॉक्टर असल्याने वैद्यकीय प्रयोगात त्यांचा वाटा मोठा असला तरी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने काही ‘इंजिनीअरिंग’चे प्रयोगही या काळात केले गेले. असे विविधलक्षी अंतराळ प्रयोग करणाऱ्या सेडन या अमेरिकतील आणि जगातील नामांकित अंतराळयात्री म्हणून ओळखल्या जातात.