
हरिनामाच्या जयघोषाबरोबरच ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘विठ्ठल सावळा…’ अशा अभंग आणि गौळणींच्या भक्तिरसात कुरारवासीय न्हाऊन निघाले. निमित्त होते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य भगवा स्फूर्ती पंधरवडानिमित्त नॉन स्टॉप भजन स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार व्हिलेज, तानाजी नगर येथे शिवसेनेने भगवा स्फूर्ती पंधरवडानिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडले. स्थानिक कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान करता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे यावेळी प्रभू यांनी सांगितले. माजी नगरसेवक सुनील गुजर आणि शिवसेना शाखा क्रमांक 36 व 37 आयोजित ही स्पर्धा कलाकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, उत्तर पश्चिम जिल्हाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित रावराणे, माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, महिला विधानसभा संघटक पूजा चौहान, रीना सुर्वे, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, प्रदीप निकम, भाई परब, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, रूपेश कदम, उपविभाग समन्वयक कृष्णाकांत सुर्वे, उपविभाग संघटक ऋचिता आरोसकर, सानिका शिरगावकर, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, रामचंद्र पवार, विजय गावडे, अजित भोगले, शाखा संघटक रूपाली शिंदे, कृतिका शिर्पे यांच्यासह भजन रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


























































