
नवीन वर्ष राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी घेऊन आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात शिक्षकांचा पगार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 19 डिसेंबरपासून शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्यामुळे पगार होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना याचा फटका बसणार आहे.
या शाळांमधील शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालीमार्फत करण्यात येते, मात्र मागील तीन दिवसांपासून ही प्रणाली बंद असल्यामुळे कोणतीही वेतन बिले जनरेट होत नाही. वेतन बिले तयार करून घेणे, ती कोषागारात सादर करणे, मंजूर करून बँक खात्यात जमा करणे यात बराच वेळ जात असल्याने डिसेंबरचा पगार वेळेत मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.


























































