
मंत्रिमंडळ विस्तार होणार होणार अशा चर्चा अधून मधून सुरू असतात. मात्र आतापर्यंत अजित पवार गटाला आपल्यासोबत घेण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आताही पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आताही मिंधे गटाला ठेंगा दाखवून अजित पवार गटाला अधिक संधी देण्याचा भाजपचा मानस आहे.
सध्या पितृपक्ष सुरू असल्यानं मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, मात्र घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असं बोललं जात आहे. यावेळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांनाच संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच केंद्रात देखील एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.


























































