विधानपरिषद निकालानंतर भाजप आणि मिंधे गटात धुसफूस, विश्वासात न घेतल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झाला नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजी वारंवार बोलून देखील दाखविली आहे. मात्र आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर मिंधे गटातील आमदारांमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कारण भाजप आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप स्वतः मिंधे गटातील आमदार करत आहेत. विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला.

यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच रणजीत पाटलांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटल आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला. आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर रणजीत पाटील यांचा विजय झाला असता, असे गायकवाड म्हणाले आहेत.

या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असूनही आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. “भाजपने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं नाही. शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, खासदार आहेत. आम्हा कुणाला विश्वासात घेतलं गेलं नाही. आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही”, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली.

“आम्ही महिन्याभरापूर्वी मतदार याद्या मागितल्या होत्या. पण त्या मतदानाच्या चार दिवसआधी मिळाल्या. त्यामुळे मतदारांपर्यंत जाण्यास मिळाले नाही. आम्ही सहजपणे मतदारांच्या मतांची फेरफार जिल्ह्यामध्ये करु शकलो असतो. पण दुर्देवाने आमच्या लोकांना विश्वासात घेतलं नाही. एखाद्या पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून 12 वर्ष काम करताना सर्वांना खूश ठेवता येत नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर या गोष्टीचे काहीसे पडसाद पडतात”, असे गायकवाड म्हणाले.