
दिवाळी हा सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. हिंदुस्थानात मोठ्या उत्साहाने दिवाळी हा सण साजरा केला जातो. पण हा सण केवळ आपल्याच देशात आनंदाचा प्रकाश पसरवतो असं नाही, तर तो हिंदुस्थानव्यतिरिक्त कितीतरी देशांत साजरा केला जातो. आपल्याच शेजारचा देश नेपाळमध्ये देखील दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथे लोक कुत्र्यांची पूजा करून दिवाळी साजरी करतात.
नेपाळमध्ये दिवाळी या सणाला ‘तिहार’ असं म्हटलं जात. आपल्या देशात जशी दिवाळी साजरी केली जाते, तशीच येथेही केली जाते. लोक दिवे लावतात, नवीन कपडे परिधान करतात, फटाके फोडतात. मात्र नेपाळमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘कुकुर तिहार’ म्हणतात. या दिवशी लोक कुत्र्यांची पूजा करतात.
नेपाळमध्ये हा उत्सव 5 दिवस चालतो. या काळात लोक वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. गाय, कुत्रा, कावळा, बैल आदींची पूजा केली जाते. कुकुर तिहारच्या दिवशी कुत्र्यांचा सन्मान केला जातो. त्यांना फुलांचे हार घातले जातात. टिळक लावला जातो. तसेच त्यांना अंडी आणि दूधही खायला दिले जाते. कुत्रे नेहमी सोबत असावेत अशी लोकांची इच्छा असते. श्रद्धेवर विश्वास ठेवायचा झाला तर कुत्रे हे भगवान यमाचे दूत आहेत. तुमचा मृत्यू झाल्यानंतरही कुत्रे तुमचे रक्षण करतात, असाही नेपाळमध्ये समज आहे. यामुळेच त्याची पूजा केली जाते.


























































