दिवाळीच्या पाच दिवसांत आगीच्या 196 दुर्घटना, फटाक्यांमुळे 50 ठिकाणी आगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवाळीच्या पाच दिवसांत शहर आणि उपनगरात 196 ठिकाणी आगी लागल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यापैकी 50 ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले आहे. सुदैवाने या आगींमध्ये कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.

5 ते 9 नोव्हेंबरदरम्यान दीपावलीचा सण देशभरात साजरा झाला. या कालावधीत फटाक्यांमुळे आगी लागण्याचा धोका असतो. त्यामुळे अग्निशमन दलाला या दिवसांत दक्ष राहावे लागते. मात्र यंदाच्या दिवाळीत आगीचे 196 कॉल अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमकडे आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या पाच दिवसांत आगीचे जे एकूण कॉल आले त्यात 190 कॉलमध्ये एक क्रमांकाची वर्दी होती तर पाच ठिकाणी दोन क्रमांकाची आग होती आणि एका ठिकाणी तीन क्रमांकाची वर्दी होती. दिवाळीदरम्यान लागलेल्या बहुतेक आगी या लेव्हल एकच्या असल्याने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

विक्रोळीत आग: एक जण गंभीर जखमी

विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये आज दुपारी सवा तीनच्या सुमारास गॅस सिलिंडरची गळती झाल्यामुळे लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी शंकर ठाकूर या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर क्रमांक 2 मध्ये आज दुपारी सवा तीनच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तीन जण भाजले आहेत. या तिघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शंकर ठाकूर (44), सुरेंद्र पाटील (35) आणि परेश राठोड (28) अशी या तिघांची नावे आहेत. त्यापैकी शंकर ठाकूर हे 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

तीन वर्षांत आगीच्या 170 घटना

मुंबईत गेल्या तीन वर्षात फक्त दिवाळी दरम्यान फटाक्यांमुळे 170 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

सन 2016 – 83
सन 2017 – 37
सन 2018 – 50

तारीख -आगीचा कॉल फटाक्यांमुळे आग
6 नोव्हेंबर – 31 – 6
7 नोव्हेंबर – 52 – 16
8 नोव्हेंबर – 74 – 15
9 नोव्हेंबर – 32 – 12
10 नोव्हेंबर – 7 – 1
एकूण – 196 – 50