डॉलरची दिवाळी; रुपयाचं दिवाळं! विक्रमी घसरण;  एका डॉलरसाठी  83 रुपये मोजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन दिवाळीच्या तोंडावर रुपयाची विक्रमी निच्चांकी घसरण सुरू असून, बुधवारी एका डॉलरसाठी तब्बल 83 रुपये मोजण्याची वेळ आली. पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपयाने 83 ची पातळी गाठली. त्यामुळे ‘डॉलरची दिवाळी आणि रुपयाचं दिवाळं’ निघालं असून, अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

‘रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होतोय’, असे भयंकर विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी तीन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे आधीच घसरणीला लागलेल्या रुपयामुळे बाजारात आणखी चिंता वाढली. रुपयाची घसरण थांबतच नसल्यामुळे गुंतवणूकदारही धास्तावले. देशातून मोठय़ा प्रमाणावर परकीय गंगाजळी बाहेर जात असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.

मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 82.40वर बंद झाला. बुधवारी त्यात आणखी तब्बल 61 पैशांनी अवमूल्यन झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया 83.01 पर्यंत घसरला. आजवरची ही ऐतिहासिक घसरण आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘डॉलरची दिवाळी आणि रुपयाचं दिवाळं’ निघालं आहे.

महागाई वाढणार

कच्च्या तेलाची आयात डॉलरमध्ये होते. पर्यायाने तेलासाठी जादा रुपया मोजावा लागेल. त्यामुळे लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किंमती भडकतील. याचा परिणाम म्हणून महागाई आणखी वाढणार आहे.

अनेक आयात वस्तूंची दरवाढ आगामी काळात होण्याची शक्यता आहे.