ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना ‘शॉक’; आठ इमारतींची वीज १५ तास गायब, महावितरणची भूमिगत केबल जळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना महावितरणने जबरदस्त ‘शॉक’ दिला आहे. भूमिगत केबल जळाल्याने तब्बल १५ तास वीज गायब झाली. मंगळवारी रात्री ११ ते आज दुपारपर्यंत सुदर्शननगर परिसरातील आठ इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. लहान मुले, वृद्ध आणि आजारी असलेल्यांनादेखील वीज गेल्यामुळे त्रास सहन करावा लागला. डोंबिवलीकरांनी रात्र अक्षरशः जागून काढली.

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागात सुदर्शननगर येथे प्लॉट क्रमांक १५ परिसरात महावितरणची भूमिगत केबल जळाली. स्थानिक जागरूक नागरिकांनी तातडीने याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन तांत्रिक दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण रात्र असल्याने जॉइंट मारणे किंवा नवीन केबल टाकणे ही कामे करता आली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

विविध कामांमुळे घटनांचे प्रमाण वाढले

बुधवारी सकाळपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. अखेर दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास केबलला जॉइंट मारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, डोंबिवलीतील विविध भागांत रस्ते, नाले, गटारे आणि सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू असताना महावितरणच्या भूमिगत केबलना वारंवार धक्का लागत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.