
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान आणि प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात बळी गेलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या वारसांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज आंदोलन करण्यात आले. अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाला दोन वर्षे, तर प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही बळी गेलेल्या कामगारांच्या वारसांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
अमुदान आणि प्रोबेस कंपनीत झालेल्या दुर्घटनांमध्ये बळी गेलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमुदान कंपनीसमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये जिल्हा सचिव सुधीर पाटील, जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील, शहरप्रमुख सुरेश परदेशी, उपतालुकाप्रमुख किरण पाटील, उपशहरप्रमुख जगदीश जुलूम, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, मंगेश मोरे, सखाराम बांदे, माजी विभागप्रमुख राजू नलवडे, उपविभागप्रमुख शैलेश गवळी, विलास नायर, मेंटर सेलचे शाखाप्रमुख संजय मांजरेकर, अभय दिवे, मंगेश राममळेकर, हेमंत धिवावकर, राजू पवार, प्रियंका काळेकर, श्रद्धा नाईक, समीर सवनीस, विक्की ठोंबे, पंडित पाटील, वैभव संते, अनुज मोरे, रूपाली पाटील, गजानन पाटील, मुकुंद म्हात्रे, सुनील पाटील, मुकेश म्हात्रे, अनंत बडेकर, संदीप पालकरी आदी सहभागी झाले होते.
अमुदान स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रोहिणी कदम यांचे वडील चंद्रकांत कदम तसेच मनोज जोंधळे यांच्या पत्नी सरला जोंधळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. या स्फोटामुळे आसपासच्या नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांनी केली आहे.


























































