
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील चांगल्या संबंधात मिठाचा खडा पडला आहे. इराण युद्ध, ऊर्जा सुरक्षा आणि पोप लिओ यांच्या समर्थनार्थ जॉर्जिया मेलोनी यांनी केलेल्या वक्तव्यावरून ट्रम्प नाराज झाले आहेत. याबद्दल इटलीमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपली मते मांडली. ‘‘मला त्यांच्या भूमिकेमुळे धक्का बसला आहे. मला वाटलं होतं की, त्या धाडसी आहेत. पण मी चुकीचा होतो,’’ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पुढे म्हणाले की, मी विचार केला होता, त्यापेक्षा त्या खूपच वेगळ्या आहेत. तसेच ट्रम्प यांनी संघर्षाच्या काळात अमेरिकेला पाठिंबा देण्यास त्या अपयशी ठरल्याचा आरोपही केला.
ट्रम्प यांनी पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षिततेबाबत इटलीच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ‘‘जॉर्जिया मेलोनी यांना आम्हाला युद्धात मदत करू इच्छित नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. तुमचे राष्ट्राध्यक्ष तेल मिळवण्यासाठी काहीही करत नाहीत ही गोष्ट लोकांना आवडेल का?’’ तसेच तसेच नाटोमध्ये असून अमेरिकेची मदत करण्यात त्या अपयशी झाल्याचा आरोप केला. ट्रम्प यांनी आपले मेलोनी यांच्याशी खूप दिवसांपासून बोलणे झाले नसल्याचेही स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले की, ‘‘त्या स्वतःच अस्वीकार्य आहेत. कारण इराणकडे अण्वस्त्र आहेत की नाही याची त्यांना फिकीर नाही आणि संधी मिळाली तर इराण दोन मिनिटांत इटलीला उडवून देईल.’’ मेलोनी या पूर्वीसारख्या व्यक्ती राहिल्या नाहीत आणि इटली पुन्हा कधीच पूर्वीसारखा देश बनणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.



























































