जामखेडमध्ये डॉ. अब्दुल कलाम सभागृह व डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

आपण साक्षर असलो तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत खुपच मागास आहोत. डिजीटल क्लासमधून विद्यार्थी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जगाच्या स्पर्धेत आपला ठसा उमटविणार आहेत. तसेच सभागृहामुळे विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सभागृह व डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन करतांना सांगितले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहाचे व डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन नामदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल कर्जतकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव मोरेश्वर देशमुख, अशोक शिंगवी, दिलीप गुगळे, राजेश मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोतम उतेकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, सोमनाथ राळेभात, विठ्ठल राऊत, गटविकास अधिकारी पोपट काळे, प्राचार्य अनंता खेत्रे, राजेंद्र मुळे, एस. एन पारखे, दत्तात्रय काळे, जुल्फिकार पठाण, सुभाष घुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरात प्रचंड दुष्काळ आसतानाही जलयुक्तच्या कामामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बरी आहे. शहराचा पाणीप्रश्न लवकरात लवकर उजणीतून पाणी आणून शहरवासीयांना दररोज पाणी दिले जाईल. तसेच क्रीडा संकुलचा प्रश्नही लवकरात लवकर निकाली काढू संस्थेसाठी अद्यावत प्रयोगशाळा व जीमचे साहित्य दिले जाईल. मोठय़ा संघर्षातून हि संस्था उभी राहिली आहे. क्रांती ही संघर्षातूनच होत असते. संस्थेच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

सुनिल कर्जतकर म्हणाले की, सभागृहाला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान शास्त्रज्ञांचे नाव दिले याचा सार्थ अभिमान आहे कारण कलामांनी गरीबीतून जिद्द, चिकाटी, मेहनत व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून उच्च पदापर्यंत गेले तसेच परिसरातील विद्यार्थी कलामांची प्रेरणा घेऊन संस्थेचा व स्वता:चा नावलौकिक वाढवतील.

उद्धव देशमुख यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी तर प्राचार्य अनंता खेत्रे यांनी प्रस्तावित केले व आभार राजेश मोरे यांनी मानले.