पुस्तकांच्या पलीकडे भवताल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

भवताल सुधारलं तर मुलं सुधारतील. मुलांना एक ऑफलाइdन, ‘श्यामची आई’सारखी आई हवी. वेळ देणारी आई, मुलाला कुशीत घेणारी, गोष्टी सांगणारी व स्वतच्या हातचं मोडकंतोडकं खाऊ घालणारी. मुलांना समर कॅम्पला पाठवणारी आई नको. मुलांना आईच्या तालमीतच जिजाऊसारखं शिकायला मिळावं.

मुलांना नको पिझ्झा, बर्गर… मुलांना हवेत चांगले संस्कार! आज मुलांच्या गरजाच अमर्याद वाढल्या आहेत आणि वाढवू दिल्या जात आहेत. मुलांच्या सभोवतालचं जग हे मायानगरी आहे. प्रलोभनांमध्ये मुले न्हाऊन निघत आहेत. सभोवताली लैंगिक भवताल आहे, त्याला आळा घालणारे पालक हवेत.
आजचे सगळे प्रश्न नैतिक, लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळेच निर्माण झाले आहेत. मूल्यं व नैतिक शिक्षणाची केव्हाच वाट लागली आहे. प्रसारमाध्यमांचा विळखा मुलांभोवती घट्ट होत चालला आहे. शिक्षणात मूल्ये रुजण्यासाठी वातावरण निर्मिती आवश्यक असते. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धती व गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये या प्रश्नांची तीव्रता जाणवत नव्हती. कारण नैतिकतेचे संस्कार घट्ट खिळ्यांसारखे रुतून बसलेले होते. क्वचितच मन भरकटत असे. आता घरात व शाळेत अश्लील गाण्यावर व नृत्यावर मुलं अंग हलवत व हावभाव करत असताना त्यांना लैंगिक शिक्षण देणं आव्हानात्मकच आहे. सध्याच्या कुटुंब पद्धतीमध्ये चार युक्तीच्या गोष्टी सांगणारं कोणी नाही. गोष्टीच्या माध्यमातून नैतिकता व उपदेश सांगितले जायचे. अनौपचारिकरीत्या कसं वागावं याचा वस्तुपाठ असायचा. वेगळे लैंगिक, नैतिक शिक्षण नव्हते.
काय योग्य, काय अयोग्य याचा न्यायनिवाडा व्हायचा. कुणाचा तरी दरारा आसायचा, जरब असायची. त्याच्यामुळे पाऊल सहसा वाकडे पडत नसे. आता शाळा, कुटुंबात पालकांचा वचक राहिला नाही. काही ठिकाणी पालकच मुलाला घाबरून असतात. पालकांच्या वागण्याने आणि सर्व बंधने झुगारल्यामुळे त्यांनाही आपल्या पाल्यांना रागावण्याचा नैतिक आधार राहिला नाही.

पूर्वीच्या भवतालात संस्काराची आगारे होती. चित्रपटातील गाणी संस्कार करत होती. त्यांनी केवळ नातेसंबंधावर प्रकाश टाकला नाही, तर मनाचे भावनिक पोषण केले. चांगले विचार रुजविणारी ती पिढी होती. सामाजिक चित्रपटांनी संस्कार केले. ‘श्यामची आई’सारख्या पुस्तकांनी संस्कार केले. कुटुंब आणि समाजानेसुद्धा संस्कार केले. ‘वैष्णव जन तो तेणे कहीऐ जो पीड पराई जाने रे…’ हे गांधींनी शिकवले. नंतर आलेल्या गाण्यांनी, चित्रपटांनी सगळंच बदललं.

आंतरजालच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. शाळेतील मुलं फेक अकाऊंट उघडतात आणि अश्लीलतेच्या चर्चा करून बलात्कारापर्यंत जातात तेव्हा पालकांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. याआधीची पिढी अभिजात वाङ्मय, अध्यात्मावर, नैतिकतेवर पोसली गेली.
अनेक नियंत्रित, अनियंत्रित गोष्टींचा वावर आमच्या सभोवताली आज आहे. आम्हीच तो निर्माण केला आहे. निर्भया प्रकरण झाले तरी निर्भयपणे स्त्राr विटंबना चालूच आहे. नको त्या वयात नको ते पाहिलं की मुलं अस्वस्थ होतात, उद्ध्वस्त होतात.

अभ्यासाची चर्चा न करता अश्लीलतेची चर्चा करून सामूहिक बलात्काराचा गृहपाठ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
कालांतराने प्रेम, अनुनय, शृंगार, प्रणय, यौवन शब्दांना अर्थ राहणार नाही. वासना हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असं वाटणारा एक वर्ग तयार होत आहे. भावविश्व कामविश्व बनत आहे. शाळा, घर यांना घरघर लागली आहे. घराला घरपण देणारी माणसं राहिली नाहीत.

मुलांच्या नशिबात ‘श्यामच्या आई’ नाही, तर मोबाइलच्या कुबडय़ा आहेत. प्रेमस्वरूप आई हे त्यांच्या कानावर पडतच नाही, तर ‘हॅपी मदर्स डे’ एवढंच त्यांच्या कानावर पडतं. पूर्वीची पिढी पालकांच्या धाकात होती, जी आज बालकांच्या धाकात आहे. अश्लीलता घरात आणि मालिकेतही आली आहे. चित्रपटात, साहित्यात आली आहे. संस्कारांचा टीपकागद किती पुरणार?

घरच्यांबरोबर नको ते मुले पाहतात. मुलंही शॉक आब्सार्बर बनली आहेत. रक्तात काय भिनतं याला खूप महत्त्व आहे, संस्कार की विकार? ‘श्यामच्या आई’च्या संस्काराला गाडून वासनेने बरबटलेल्या इमारतीत मुलं हसत खेळत, बागडत आहेत. त्यांच्यासमोर निसर्ग येतच नाही. फक्त अश्लीलतेचा संसर्ग येतो. मुलांना चांगलं ऐकू द्या, चांगलं पाहू द्या. आस्वाद घ्यायला शिकवा, रसग्रहण करायला शिकवा. सामाजिक उत्तरदायित्व शिकवा. शब्दांच्या पलीकडे जायला व विचार करायला शिकवा. हेच शिक्षण त्यांना तारेल. हतबल पालकांनी कठोर व्हायची वेळ आली आहे. अनैतिकतेला लॉकरमध्ये टाकायची वेळ आली आहे. भवताल सुधारणे हेच खरे नैतिक, लैंगिक शिक्षण होय.

[email protected]