सोमवारचा मुहूर्त निघाला…प्रीतम मुंडे, बजरंग सोनवणे एकाच दिवशी अर्ज भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांनी सोमवारचा मुहूर्त ठरवला आहे, एकाच दिवशी दोन्ही उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत.

बजरंग सोनवणे यांची उमेदवारी गत आठवड्यात जाहीर करण्यात आली तर भाजपाच्या प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर काल शिक्कामोर्तब झाला. या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची लढत पाहण्यास मिळू शकते, असा तर्क लावला जात आहे. डॉ प्रीतम मुंडे या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. मतदाराच्या भेटी गाठी घेत आहेत. बजरंग सोनवणेही जिल्हाभरात फिरत आहेत. प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराची मदार पालक मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार, आर टी देशमुख, संगीता ठोबरे यांच्यावर राहणार आहे. त्या स्वतःही उत्कृष्ट वक्त्या आहेत तर राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर असणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा यांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसानंतर प्रचाराचा वेग वाढणार आहे. सोमवारी भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे परळीत गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन बीड मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर याच दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही उमेदवार शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करतात की नाही हे सोमवारी कळेल.