मातापित्यांची जबाबदारी नाकारताय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ऋतु सारस्वत

अलीकडील काळात विवाहित कुटुंबांमध्ये पतीच्या आई-वडिलांना म्हणजेच सासूसासऱ्यांना न सांभाळण्याचा प्रघात मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. याबाबत अनेक मतमतांतरेही दिसून येतात, परंतु मुलाने हात सोडलेल्या वयोवृद्ध मातापित्यांनी जायचे कुठे याचा विचार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे अलीकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार कोणत्याही पतीला आपल्या पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडणाऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये सिंगापूर संसदेचे सदस्य

वॉल्टर वून यांनी टीकाकारांना उत्तर देताना असे म्हटले की, पॅरेंटल केअर कायदा आईवडिलांवरील प्रेमाला प्रोत्साहन देणार नाही. वून म्हणाले, जिथे नैतिकतेने काम होत नाही, तिथे कायदा संरक्षण देण्याची भूमिका पार पाडतो.

कोणत्याही पतीला आपल्या पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडणाऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. 2016 मध्ये नरेंद्र वि. मीनाच्या संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते की, हिंदू समाजात आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे इतिकर्तव्य आहे. समाजातील रूढीपरंपरा आणि प्रथांविरोधात जाऊन आपल्या पतीच्या उत्पन्नावर तिचा एकटीचाच अनन्य अधिकार आहे असे सांगत कोणत्याही न्याय्य कारणाशिवाय पतीला वेगळे राहण्यास भाग पाडत असेल तर ते मान्य होणार नाही.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला कट्टर स्त्रीवादी समर्थकांनी पितृसत्ताक व्यवस्थेचे पालनपोषण करणारा म्हणून संबोधले होते. कारण स्त्रीचे लग्न केवळ पुरुषाशी होते आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी नाही अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे पत्नीला पतीसोबत एकटे राहण्याचा अधिकार आहे असे या गटाचे म्हणणे असते. तीव्र व्यक्तीवादी विचारसरणीवर आधारित ही मानसिकता वृद्ध पालकांना ओझे म्हणून पाहते. पाश्चिमात्य संस्कृतीचा बुरखा पांघरलेले तथाकथित आधुनिक परंपरेचे पुरस्कर्ते एकल कुटुंबाच्या बाजूने आहेत. प्रत्यक्षात आज हेच पाश्चात्त्य देश विखुरलेली कुटुंबे आणि वडीलधाऱ्यांना एकटेपणाशी झुंजताना पाहून व्यथित होताहेत. पालकांची आज्ञा न मानणाऱ्या, त्यांची अवहेलना करणाऱ्या मुलांना शिक्षा होऊ शकेल अशा प्रणालीची स्थापना करण्याचा ते अधिकाधिक प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेच्या 30 राज्यांमध्ये फिलियल रिस्पॉन्सिबलिटी (डय़ुटी ऑफ केअर) हे विधेयक संमत करण्यात आले आहे. डेव्हिस विरुद्ध कॉमनवेल्थ ऑफ व्हर्जिनियामध्ये व्हर्जिनियाच्या सर्वोच्च न्यायालयाने मेरी डेव्हिसला तिच्या आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मेरीने तिच्या बचावात असा युक्तिवाद केला की, तिच्या आईची काळजी घेणे हे तिचे मूलभूत कर्तव्य नाही. हिंदुस्थानातही विवाहित मुलींनी त्यांच्या पालकांची काळजी घेणे बंधनकारक आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. 18 फेब्रुवारी 1987 रोजी ‘विजया मनोहर अरबत विरुद्ध काशीराव राजाराम सवाई आणि इतर’ या खटल्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिपणी उल्लेखनीय आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित मुलीवर तिच्या पालकांना सांभाळण्याचे बंधन नाही हा युक्तिवाद आम्ही स्वीकारण्यास असमर्थ आहोत. ही विकृती नाही तर आणखी काय आहे? एकीकडे विवाहित मुली आई-वडिलांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य नसून मुलांचे कर्तव्य आहे असे मानतात, तर दुसरीकडे मुलांच्या बायका  सासू-सासऱ्यांची काळजी घेणे हा त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्राचा भाग नाही असे म्हणतात. मग वृद्ध आई-वडिलांनी जायचे कुठे? या

यक्षप्रश्नाच्या उत्तरात हिंदुस्थान, चीन, सिंगापूर, इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत पालकांच्या पालनपोषण आणि कल्याणाशी संबंधित कायदे करण्यात आले आहेत.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये सिंगापूर संसदेचे सदस्य वॉल्टर वून यांनी टीकाकारांना उत्तर देताना असे म्हटले की, पॅरेंटल केअर कायदा आईवडिलांवरील प्रेमाला प्रोत्साहन देणार नाही. वून म्हणाले, जिथे नैतिकतेने काम होत नाही, तिथे कायदा संरक्षण देण्याची भूमिका पार पाडतो.

प्रश्न केवळ वृद्ध आई-वडिलांच्या आर्थिक गरजांचा नाही. त्याहून गंभीर समस्या म्हणजे त्यांच्यात वाढत जाणारा एकटेपणा ही आहे. हा एकटेपणा अपराधीपणाच्या भावनेला आणि नैराश्यालादेखील जन्म देतो. ब्रिस्टलच्या वेस्ट इंग्लंड विद्यापीठातील मानसशास्त्राच्या व्याख्याता लुसी ब्लेक म्हणतात की, जेव्हा मुलांचे त्यांच्या पालकांशी खेळीमेळीचे संबंध नसतात तेव्हा पालकांच्या मनात अपयशाची भावना येते आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो. त्याच वेळी पालक म्हणून आपण आपली भूमिका आणि जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत अशी अपराधीपणाची भावना वाढीस लागण्यास मदत होते. ‘अडोलसेंट्र-टू-पेरेंट अॅब्युज: करंट अंडरस्टँडिंग्ज इन रिसर्च पॉलिसी अँड प्रॅक्टिस’च्या लेखिका अमांडा हॉल्ट म्हणतात की, या सर्वांमध्ये अधिक वेदनादायक बाब पालकांकडे सर्व शक्ती असते; पण मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्या शक्ती मुलांच्या हातात जातात या सत्याकडे किंवा वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही. आज आपल्या आई-वडिलांना आपण जी कठोर वागणूक देत आहोत, तीच उद्या चालून आपल्या वाटय़ालाही येऊ शकते याचे भान ठेवले नाही किंवा त्याचा विचार केला नाही, तर ती सर्वात मोठी चूक ठरेल यात शंका नाही.

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत)