आरोग्य – मॅरेथॉनमध्ये धावताना

>> डॉ. विद्या सुरतकल (हृदयरोगतज्ञ, लीलावती रुग्णालय)

सध्या अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात सहभागी होण्यापूर्वी आपला सराव, त्यातील नियमितता, हृदयाशी संबंधित तपासण्या या सर्व निकषांवर स्वत:ला तपासून पाहणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते. धावण्याचा वेग अचानक वाढला की, हृदयावर ताण येतो. आपले शरीर एवढा ताण सहन करण्यास सक्षम आहे की नाही, यावर बऱयाच बाबी अवलंबून असतात.

हिवाळ्याच्या दिवसांत तापमानात घट झाल्याने हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी धोका निर्माण होऊ शकतो. कारण या काळात हृदयविकार तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. थंड हवामानामुळे हृदयावर अधिक ताण पडतो, रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि शरीराभोवती रक्त परिसंचरण कमी होते. यामुळे हृदयातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते आणि हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. म्हणूनच थंड हवामानात हृदयाच्या कार्यात अडथळे येतात, ज्यामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.

फक्त हिवाळ्यातच नाही, तर मुंबई मॅरेथॉन धावण्यापूर्वी लोकांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेतली पाहिजे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य तसेच मानसिक आरोग्यासंबंधित फायद्याचे ठरते. नियमित व्यायामाने हृदयविकाराचा धोका कमी होतो, तर लांब पल्ल्याच्या धावण्याने हृदय व रक्तवाहिन्यांवर जास्त ताण पडतो. ज्यामुळे हृदयाशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात. मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमुळे हृदय कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये अॅट्रियल फायब्रिलेशन आणि अॅरिथमियाचा धोका वाढू शकतो.

मॅरेथॉनदरम्यान डिहायड्रेशन हृदयावर लक्षणीय परिणाम करते, ज्यामुळे गंभीर आरोग्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जेव्हा शरीराचे निर्जलीकरण होते तेव्हा रक्ताभिसरण मंदावते.  रक्त पंप करण्यासाठी व अवयव आणि स्नायूंना आवश्यक ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या वाढत्या ताणामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. तसेच हृदयाचा झटका येण्याची शक्यता वाढते. निर्जलीकरणामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते.

यामुळे मॅरेथॉनदरम्यान किंवा नंतर हृदयासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना हृदयाचे कशी काळजी घ्याल –

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराचे तापमानदेखील कमी होते. त्यामुळे हृदयाला अधिक रक्त पंप करण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात. ज्यामुळे त्यावर अधिक भार येतो. हिवाळ्यात तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग किंवा नृत्यासारख्या ािढयांमध्ये सािढय रहा. कालेस्टेराल पातळी नियंत्रित राखण्यासाठी आणि संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास चांगले राखण्यासाठी मासे, सुका मेवा, फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. वजन निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. कारण जास्त वजनामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडतो.

हिवाळ्यात जास्त कॅलरीयुक्त आहाराचे सेवन करणे टाळा आणि संतुलित आहाराचे सेवन करा. कार्डिओलॉजिस्टकडे नियमित तपासणी आणि फॉलोअपसाठी जा. कृपया कोणतीही औषधे स्वत:च्या मर्जीने घेऊ नका. कारण ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मॅरेथॉनच्या तयारीसाठी फक्त शारीरिक प्रशिक्षणाची गरज नाही. यामध्ये संभाव्य धोके समजून घेणे, शारीरिक क्षमता तपासणे गरजेचे आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या ओळखण्यासाठी तज्ञांकडून नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. प्रशिक्षणादरम्यान छातीत दुखणे, धाप लागणे किंवा धडधडणे यांसारख्या चिन्हांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.