शिक्षक बनण्याचे स्वप्न कायमचे भंगले, टीईटीत झोलझाल करणाऱया शिक्षकांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकाराबाबत कायदेशीर गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मोठी कारवाई केली आहे. या उमेदवारांवर परीक्षा परिषदेने बंदी घातली असून यापुढे त्यांना टीईटी परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे या उमेदवारांचे भविष्यात शिक्षक बनण्याचे स्वप्न कायमचे भंगले आहे.

परीक्षा परिषदेने या 1 हजार 663 उमेदवारांच्या नावांची यादीच जाहीर केली असून यातील 779 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अंतिम निकालात त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे, तर 884 उमेदवारांनी अपात्र असतानाही बनावट प्रमाणपत्र सादर करून शिक्षकपदी नोकरी मिळविली आहे. या अशा सर्व उमेदवारांना परीक्षा परिषदेने आता बाहेरचा रस्ता दाखवला असून या उमेदवारांची परीक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून त्यांना यापुढे घेण्यात येणाऱया शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केल्याचे जाहीर केले आहे.

वर्ष 2018 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी कलम 409, 420, 406, 465, 467, 468, 34, 120 (ब) सह माहिती-तंत्रज्ञान कायदा कलम 66(डी) सह परीक्षा गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (1990 सुधारित) कलम 7, 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याच्या तपासादरम्यान उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता 1 हजार 663 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे समोर आले. प्रत्यक्षात हे उमेदवार टीईटी परीक्षेत अपात्र असताना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःला पात्र करून घेतल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले.

चुकीच्या पद्धतीने ज्या उमेदवारांनी टीईटी परीक्षेत पात्रता सिद्ध केली त्यांची शिक्षक बनण्याची पात्रताच नाही. भविष्यात या उमेदवारांना शिक्षकपदी विराजमान होण्याची संधी न मिळणे हा न्याय आहे. परीक्षा परिषदेच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. गैरप्रकार करणाऱया काही उमेदवारांमध्ये राज्यात शाळांमध्ये शिकविणारे शिक्षकही आहेत. आता या शिक्षकांच्या पदावर नेमणुका करताना आधी अतिरिक्त शिक्षकांची वर्णी लागेल. त्यानंतर अभियोग्यता चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना घेण्यात येईल.

संतोष मगर, अध्यक्ष,  डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन, महाराष्ट्र

1663: वर्ष 2018च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणारे उमेदवार

779: गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असतानाही अंतिम निकालात पात्र ठरलेले

884: अंतिम परीक्षेत अपात्र असूनही बनावट प्रमाणपत्र मिळविणारे