
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग या सुमारे पाचशे किमी लांबीच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा ‘ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’च्या ड्रोन सर्व्हेच्या कामाला आणि आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या द्रूतगती महामार्गाचे काम आता द्रूतगतीने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई ते सिंधुदुर्ग असा रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांना जोडणाऱया ग्रीन फिल्ड कोकण द्रूतगती महामार्गाची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आखली आहे. या प्रकल्पाची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती.
विकासाचा महामार्ग
या महामार्गामुळे कोकणातील हापूस आंबा-काजू सुपारी, नारळ उत्पादनांसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे हा महामार्ग कोकणसाठी विकासाचा महामार्ग ठरणार आहे. या ग्रीन फिल्ड कोकण द्रूतगती महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘अंमलबजावणी संस्था’ म्हणून नियुक्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. द्रूतगती महामार्ग बांधण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे ड्रोन व लिडार सर्व्हे करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती
या प्रकल्पासाठी तांत्रिक, अभियांत्रिकी व आर्थिक सुसाध्यता अहवाल करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत अलिकडेच घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता नजरेच्या टप्प्यात आला आहे.
असा असेल हा मार्ग
- उरणमधील चिर्ले ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी असा पाचशे किमी लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर बांधण्यात येणार आहे.
- शिवडी ते न्हावा शेवा बंदर ज्या भागात संपते त्या परिसरातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग असेल. हा मार्ग कोकणच्या किनारपट्टीवरून जाईल. या मार्गावरून प्रवास करताना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल. शिवाय समुद्र किनाऱयालगतच्या पर्यटन विकासाला व पृषी उद्योगालाही चालना मिळेल.

























































