
हिंदुस्थानात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या क्यूडीईएनजीए लसीला बाजारात वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही लस 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी व्यक्तीला याआधी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही याची तपासणी करण्याज गरज राहणार नाही.
हिंदुस्थानात मिळालेल्या मंजुरी ताकेडाच्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. याअंतर्गत फेज 1, फेज2 आणि फेज 3 चे एकूण 19 क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आले आहेत. ज्यात 28 हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला. क्यूडेंगा (टीएके-003) ही जपानी कंपनी ताकेडाने शोधलेली लस आहे, परंतु मेक इन इंडियांतर्गत या लसीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन देशातच होईल. यासाठी ताकेडाने हैदराबादमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी बायोलॉजिकल ईसोबत करार केला आहे. हिंदुस्थानात उत्पादन होत असल्यामुळे याचा पुरवठा जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल.





























































