बदला घेण्यासाठी गिफ्टमध्ये टाकायचा ड्रग्ज; क्राईम ब्रँचकडून दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदला घेण्यासाठी अभिनेत्रीसह पाच जणांना दुबई येथे पाठवून त्यांना खोटय़ा गुह्यात तुरुंगात पाठवणाऱ्या दोघांना अखेर क्राईम ब्रँच युनिट 10 ने अटक केली. राजेश बोभाटे ऊर्फ रवी आणि अँथोनी पॉल अशी त्या दोघांची नावे आहेत. दुबईला जाण्यापूर्वी त्या व्यक्तींना गिफ्ट म्हणून देण्यात येणाऱ्या ट्रॉफी किंवा केकमध्ये अँथोनी हा ड्रग्ज टाकायचा अशी त्याची गुह्याची पद्धत होती.

अँथोनी आणि तक्रारदार महिलेचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्याचा राग अँथोनीच्या डोक्यात होता. त्या महिलेला अद्दल घडवण्यासाठी त्याने रवीची मदत घेतली. मार्च महिन्यात महिलेला एक मेसेज आला. तुमच्या मुलीला अभिनयात करीअर करायचे असल्यास सांताक्रूझच्या एका हॉटेलमध्ये भेटण्यास यावे असे सांगण्यात आले. करीअर होईल या हेतूने ती महिला आणि अभिनेत्री मुलीसह रवीला भेटली. तेव्हा रवीने एक कंपनी हॉलीवूडमध्ये वेब सीरिज काढत असल्याचे सांगितले. त्या वेब सीरिजसाठी दुबईला ऑडिशन होणार आहे. त्याचा खर्च कंपनी करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने अभिनेत्री मुलीला दुबईला पाठवले.

ठरल्याप्रमाणे 1 एप्रिलला दुबईला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी रवीने तिला गिफ्ट म्हणून एक ट्रॉफी दिली होती. त्यामध्ये ड्रग्ज आढळल्याने तिला शारजा पोलिसांनी अटक केली. अटकेची माहिती समजताच महिलेने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. याचा तपास क्राईम ब्रँच युनिट 10 कडे सोपवला. प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने तपास करून अँथोनी आणि बोभाटे यांना अटक केली.

पाच महिन्यांत पाच जणांना पाठवले दुबईला   

अँथोनीचा ज्याच्यासोबत वाद झाला, त्याला अद्दल घडवण्यासाठी तो बोभाटेची मदत घायचा. बोभाटे हा पीडितांना भेटून नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दुबईला पाठवण्याचे नियोजन करायचा. अँथोनी हा केक किंवा ट्रॉफीमध्ये ड्रग्ज टाकून ते बोभाटेकडे द्यायचा. बोभाटे हा त्या वस्तू पीडितांना द्यायचा. विमान दुबईला गेल्यावर अँथोनी हा शारजा पोलिसांना फोन करून त्याची माहिती द्यायचा. ज्यांना तुरुंगातून बाहेर यायचे आहे, अशाकडून ते दोघे पैसे उकळत असायचे. गेल्या पाच महिन्यांत त्याने पाच जणांना दुबई आणि शारजाला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.