
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्व विभागाने दक्षिण विभागाच्या स्टार गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा घेतली. युवा वैभव सूर्यवंशीने सुरुवातीलाच आक्रमक फटकेबाजी करत धावांचा पाया रचला. अभिमन्यू ईश्वरन आणि शिखर मोहन यांनी डावाला आकार दिला आणि अखेरीस कर्णधार ईशान किशनने शतकी तडाखा देत दक्षिण विभागाच्या गोलंदाजांची काsंडी केली. दिवसअखेर पूर्व विभागाने 4 बाद 385 धावा उभारत अंतिम सामन्यावर पहिल्याच दिवशी पकड मजबूत केली. ईशान 111, तर कुमार कुशाग्र 63 धावांवर नाबाद आहेत.
टॉस जिंकून पूर्व विभागाने फलंदाजी स्वीकारली आणि वैभव सूर्यवंशी-अभिमन्यू ईश्वरन या जोडीने दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करत पूर्व विभागाला दमदार सुरुवात करून दिली.
वैभवच्या 44 धावांच्या आतषबाजीनंतर ईश्वरनने मोर्चा सांभाळला. त्याने 86 चेंडूंत 72 धावा करताना दहा चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर शिखर मोहननेही दक्षिण विभागाच्या गोलंदाजीचा समाचार घेत 85 धावांची शानदार खेळी केली. तो 120 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह बाद झाला. मात्र दिवसाचा खरा नायक ठरला तो पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन. संघाच्या चार विकेट गेल्यानंतर त्याने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि संयमी सुरुवातीनंतर फटकेबाजीचा वेग वाढवला. ईशानने 135 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 111 धावा करत शानदार शतक झळकवले.
कुमार कुशाग्रने तितकीच आक्रमक साथ दिली. कुशाग्रने अवघ्या 75 चेंडूंत 63 धावा करताना चार चौकार आणि तब्बल पाच षटकार ठोकले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 144 धावांची नाबाद भागीदारी रचत दिवसाचा शेवट पूर्व विभागाच्या वर्चस्वाने केला. दक्षिण विभागाकडून चामा मिलिंदने दोन, तर त्रिपुराणा विजयने एक विकेट घेतली, मात्र पूर्व विभागाच्या फलंदाजांनी त्यांचा प्रभाव फार काळ टिकू दिला नाही.
























































