इक्बाल मिर्ची प्रकरण : प्रफुल पटेल यांच्यावर EDची कारवाई; वरळीतील घर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. या चौकशीनंतर गुरुवारी ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांचं वरळीतील घर जप्त केल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

अंडरवर्ल्ड गँगस्टर इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता जप्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

कुख्यात अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना 2013 मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने 1986 मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे 200 कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे सीजे हाऊसच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. 2007 मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल. दरम्यान, मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच करत हे आरोप फेटाळले होते.