
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचे केंद्रातील भाजप सरकारचे षड्यंत्र सुरूच आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि पुण्यातील एका कंपनीचे कार्यालय, कुटुंबियांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने एकाच वेळी सकाळी सात वाजता छापे टाकले. तब्बल बारा तास सायंकाळी सातपर्यंत ही कारवाई सुरू होती. दिल्ली पोलिसांचे सशस्त्र पथक घेऊन हे छापे टाकण्यात आले. दरम्यान, ‘ईडी’च्या छाप्याचे वृत्त समजताच कागल, गडहिंग्लजसह अनेक गावांमध्ये मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले. भाजप, ईडीचा निषेध करीत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. कागल मतदारसंघातून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुश्रीफ अनेक वेळा राज्यात मंत्रीही राहिले आहेत. कागल येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या गैबी चौक येथील निवासस्थानी ‘ईडी’च्या 20 ते 25 जणांचे पथक सकाळी सात वाजता दाखल झाले. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यास सुरुवात केली. कागदपत्रे तपासली. तब्बल बारा तास चौकशी सुरू होती. सायंकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे पथक घराबाहेर पडले. या काळात घरातील सदस्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. कामानिमित्त आमदार मुश्रीफ मुंबईत असताना ही कारवाई झाली. दरम्यान, मुश्रीफ यांच्या घरासह सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि त्यांचे समर्थक, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला.
मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकताना ‘ईडी’च्या पथकाबरोबर दिल्ली पोलिसांचे सशस्त्र्ा पथकही आले होते. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. रोज सकाळी आमदार मुश्रीफ हे निवासस्थानी जनता दरबार घेतात. शेकडो लोक आपल्या अडी-अडचणी घेऊन त्यांना भेटण्यासाठी येतात. आज दिल्ली पोलिसांनी निवासस्थानाकडे जाणाऱया रस्त्यांवर कडा पहारा ठेवला. निवासस्थानाबाहेरही चोख बंदोबस्त होता.
यापूर्वीही झाली होती छापेमारी
जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरासह सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर आयकर विभागाची छापेमारी झाली होती.
अधिकाऱयांना ‘वरून’ फोन येत होते!
‘ईडी’ची कारवाई राजकीय हेतूनेच झाली असून, चौकशी अधिकाऱयांना वरून पह्न येत होते. पण आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सक्षमपणे दिली, असे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पुण्यात तीन ठिकाणी छापे
पुण्यात कोरेगाव पार्क, विद्यापीठ रस्ता आणि कोंढवा या तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ‘ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या पंपनीचे चंद्रकांत गायकवाड यांच्या कोरेगाव पार्क येथील लेपिस लाजुली या इमारतीमधील घरी ‘ईडी’च्या अधिकाऱयांनी छापा टाकला. विद्यापीठ रस्त्यावरील ब्रिक्स इंडिया कंपनीच्या वेस्टर्न कोर्ट या इमारतीतील कार्यालयातही तपासणी केली. तसेच कोंढवा येथे राहणाऱया मुश्रीफ यांच्या कन्येच्या घरीही ‘ईडी’च्या अधिकाऱयांनी तपासणी केली.
काय आहे आरोप?
2020 मध्ये गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यासाठी दिला. ही कंपनी आमदार मुश्रीफ यांच्या नातेवाईकांची असून, साखर कारखाना चालविण्याचा कोणताही अनुभव या कंपनीला नाही. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
…अन ‘ईडी’चा पत्ता चुकला!
हसन मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेल्या ‘ईडी’च्या पथकाने आज भल्या पहाटे मुश्रीफ यांचे घर समजून कागलऐवजी कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरातील एका भलत्याच घरात प्रथम छापा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे मुश्रीफांचे घर नसल्याचे समजताच पथकातील अधिकाऱयांनी तेथून काढता पाय घेऊन कागलमधील आमदार मुश्रीफ यांचे घर गाठले. दरम्यान, एवढय़ा मोठय़ा पेंद्रीय तपास यंत्रणेकडून ही चूक झालीच कशी? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
हे दबावाचे राजकारण
हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपचे काही लोक करत होते. भावना गवळी, यशवंत जाधव व इतरांबाबतही तीच भाषा वापरली जात होती, मात्र ही मंडळी आज सरकारमध्ये सामील झाली आहे आणि त्यांना दिलासाही मिळाला आहे. म्हणजे जे भाजपसोबत जातात त्यांना दिलासा मिळतो आणि जे विरोधात आहेत त्यांच्यावर दबावाचे राजकारण चालवले जाते, हे स्पष्ट झाले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. मुश्रीफ हे लढवय्ये आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर
विरोधी पक्षातील जे नेते ठामपणे उभे राहून सरकारला विरोध करतात त्यांच्याविरुद्ध यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर यापूर्वीही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या, मात्र त्यामध्ये काहीच सापडले नव्हते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
सरकारविरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई
राज्यात ईडी म्हणजेच एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरंच काहीही नाही. अतिथी देवो भवं, आमच्याकडे पाव्हणे आलेत त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
मानसिक खच्चीकरण करण्याची भाजपची खेळी, सतेज पाटील
हसन मुश्रीफ यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली गेली आहे. अशा खेळी करून महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असून कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.
कारवाई राजकीय द्वेषातून
केंद्रात आणि राज्यात कोणाचेही सरकार असले तरी राजकीय द्वेषातून कारवाई करू नये, असे माझे स्पष्ट मत असल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. सर्वच तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, पण आता जे काही घडत आहे ते पाहिल्यानंतर त्याला राजकीय रंग आहे, अशी शंका येते, असे नमूद करताना चौकशीला सहकार्य करणे आपले सगळय़ांचेच कर्तव्य आहे, पण चौकशीच्या नावाखाली नाहक कुणाला त्रास दिला जाऊ नये, असेही ते म्हणाले. अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठरावीक पक्षाच्या लोकांनाच डोळय़ासमोर ठेवून कुणी कारवाई करत असेल तर योग्य नाही, असेही अजित पवार यांनी सुनावले.



























































