
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
‘राफेल डील’बाबत मीडियात प्रसिद्ध होणार्या बातम्यांबाबत ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी केलेल्या टिप्पणीचा ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने तीव्र शब्दांत आज निषेध केला. पत्रकारांना आपल्या बातमीच्या स्रोत उघड करण्यास सांगणे सर्वथा चुकीचेच आहे, असे नमूद करतानाच प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे सरकारने कटाक्षाने टाळले पाहिजे, असा आग्रह ‘एडिटर्स गिल्ड’ने धरला आहे.
पत्रकारांविरोधात ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा वापर करण्याचा प्रयत्न निषेधार्हच ठरेल, असेही संपादकांच्या त्या सर्वोच्च संघटनेने बजावले आहे. ‘राफेल डील’बाबत वृत्तांत प्रसिद्ध करण्याच्या आणि भाष्य करण्याच्या पत्रकारांच्या स्वातंत्र्याला नख लावण्याच्या दिल्या जाणार्या धमक्या चिंताजनक आहेत, असेही संपादकांच्या संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, ‘राफेल डील’च्या प्रकरणात कागदपत्रांचा वापर करणारे पत्रकार आणि वकिलांच्या विरोधात सरकारकडून चौकशीची कार्यवाही सुरू केली जाणार नाही, अशी ग्वाही ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी आज दिली.






















































