
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी आई बाबा झाले आहेत. नेहाने आज सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ बाळंतिण सुखरुप असून नेहा व अंगदच्या कुटुंबीयांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा ठरला आहे. नेहा आई झाल्याचे कळताच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजनी सोशल साईटवर तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
सहा महिन्यांपूर्वी नेहा व अंगदने गुपचुप लग्न केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी चाहत्यांना आपल्या लग्नाची बातमी दिली होती. त्यांच्या या सिक्रेट मॅरिजमुळे अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर सोशल मीडियावरच नेहाने ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. यामुळे पुन्हा एकदा नेहा चर्चेत आली होती. पण काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये अंगदने नेहा लग्नाआधीच गरोदर असल्याचा खळबळजनक खुलासा केला. तसेच याबद्दल दोघांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांना चांगला ओरडा खावा लागल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, गरोदर असतानाही नेहाने आपली फॅशन स्टाईल कायम ठेवली होती. बेबी शॉवर वेळी नेहाने सफेद रंगाचा फ्रिलचा फ्रॉक घातला होता. त्यातही ती सुंदर दिसत होती. स्टाईलच्या बाबतीत नेहा बॉलीवूड व फॅशन जगतातही प्रसिद्ध आहे.


























































