मोफत थाळीच्या नादात आठ लाख रुपये गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन साइटवर जेवणाच्या एका थाळीवर एक थाळी मोफत अशी जाहिरात महिलेला चांगलीच महागात पडली आहे. थाळीच्या नावाखाली ठगाने महिलेची 8 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सायबर ठग हे सण /उत्सव आल्यावर फसवणुकीसाठी सोशल मीडियावर विविध मेसेज पोस्ट करतात. एका थाळीवर एक थाळी मोफत असे मेसेज व्हायरल करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. मोफत थाळीच्या नावाखाली ठगाने महिलेची फसवणूक केली आहे. वांद्रे येथे एक महिला राहते. त्या महिलेचे सोशल मीडियावर एक अकाउंट आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. तेव्हा तिला एका प्रसिद्ध हॉटेलची भोग थाळीची जाहिरात दिसली. 200 रुपयांच्या थाळीवर दुसरी थाळी मोफत अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीखाली एक लिंक होती. मोफत थाळीची जाहिरात पाहिल्यावर महिलेने त्या जाहिरातीखालील लिंकवर तिची माहिती अपलोड केली.

माहिती अपलोड केल्यावर काही वेळाने महिलेला एक पह्न आले. पह्न करणाऱयाने त्याचे नाव दीपक असल्याचे सांगून हॉटेलच्या मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर ठगाने महिलेला एक लिंक पाठवली. लिंकनंतर ठगाने महिलेला एक अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. ते अॅप्स डाऊनलोड करताच महिलेच्या खात्यातून पैसे गेल्याचा तिला मेसेज आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला तिच्या खात्यातून 8 लाख 46 हजार रुपये काढल्याचे सांगण्यात आले. फसवणूकप्रकरणी महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

काय काळजी घ्याल…

ठग हे सोशल मीडियावर मोफतच्या थाळीची जाहिरात करतात. मोफतच्या थाळीच्या जाहिरातीखाली एक फसवी लिंक असते. ठग हे लिंक पाठवून बँक खात्याची माहिती भरायला सांगतात. तसेच त्या लिंकवर माहिती शेअर केल्यास काही अॅप्स डाऊनलोड करायला लावतात. ते अॅप्स डाऊनलोड झाल्यावर ठग हे बोलबच्चन देऊन नागरिकांचा ओटीपी घेतात. ठगांच्या हाती ओटीपी येताच नागरिकांच्या खात्यातून पैसे काढतात.