
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. प्रतिकूल परिस्थितीतून आजचे ऐश्वर्य पक्षाला दिसत आहे, त्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. मीदेखील पक्षासाठी झिजलो आहे. जिथे मान मिळत होता तिथे आज अपमान होत आहे. सहन करण्याची मर्यादा संपली. त्यामुळे इतरांचे माहिती नाही, पण मी किती दिवस भाजपात राहीन याचा भरोसा नाही, असा बॉम्बगोळाच एकनाथ खडसे यांनी टाकला. संघर्षाच्या या काळात पंकजा एकटय़ा नाहीत, तर आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असेही ते म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला सामान्यांपर्यंत नेले. बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण करून दिली. मात्र त्यांच्याच लेकीचा आणि तेही गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत परळीमध्ये षड्यंत्र करून पराभव करण्यात आला. ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, हालअपेष्टा सोसल्या त्यांची अशी अवहेलना! यापेक्षा दुसरा अपमान कोणता असू शकतो असा सवालही त्यांनी केला.
परळी मतदारसंघात झालेला पराभव, भाजपमध्ये वारंवार होणारा अवमान यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट व्हायरल करून 12 डिसेंबर रोजी गोपीनाथगडावरील मेळाव्यात आपण ‘मन की बात’ करणार असल्याचे जाहीर केले होते. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टमुळे भाजपत भूकंपच आला. पंकजा मुंडे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांनीही हल्लाबोल सुरूच ठेवल्याने या संघर्षाची धार तीव्र झाली होती. त्यामुळे गोपीनाथगडावर 12 डिसेंबर रोजी नेमके काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. आज सकाळपासूनच गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांनी गडावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. या मेळाव्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता, रासपचे महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदींची उपस्थिती होती.
तुम्ही त्रास देता हे मान्य करा
रासपचे नेते महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना चांगलेच खडे बोल सुनावले. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही भाजपसोबत जोडले गेलो. तुम्ही कितीही त्रास दिला तरी आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही असे सांगत त्यांनी त्रास देता हे मान्य करावेच लागेल असे बजावले. आमच्या मनात पाप नाही, आमची नियत साफ आहे, असेही ते म्हणाले.
तक्रारींची दखल घेऊ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या तक्रारींची, त्यांनी मांडलेल्या व्यथांची दखल घेऊ असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात झालेल्या उद्रेकावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. खडसे यांनी आपले मन मोकळे केले मात्र त्यांनी शब्द जपून वापरावे, असेही ते म्हणाले.


























































