
पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांबाबत ईडी सरकारचा भोंगळ कारभार काही केल्या संपण्याचे चिन्ह दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी अपर पोलीस अधीक्षकपदी बढती देऊन नियुक्ती केलेल्या दोघा अधिकाऱयांचे आता नव्याने नियुक्ती आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.
थेट आयपीएस असलेले नीलेश तांबे यांना अपर पोलीस अधीक्षकपदी बढती देऊन त्यांची मालेगाव येथे पदस्थापना करण्यात आली होती, तर पंकज शिरसाठ यांनाही बढती देत त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मर्जीतल्या अधिकाऱयांची इच्छुक ठिकाणी नेमणूक करण्यासाठी जोर लावण्यात व्यस्त असलेल्या ‘ईडी’ सरकारचा बदल्यांमधला गोंधळ सुरूच आहे.
आज गृह विभागाने नवा आदेश जारी करत नीलेश तांबे यांची अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार, तर पंकज शिरसाठ यांची अपर पोलीस अधीक्षक पालघर अशी नियुक्ती केली आहे. याशिवाय अनिकेत भारती यांची अपर पोलीस अधीक्षक मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली असून विजय पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत. बदलीचे आदेश जारी करून मग काही बदल्यांना स्थगिती, पुन्हा नवा बदली आदेश असा खेळच ‘ईडी’ सरकारने मांडला आहे.


























































