
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी भाजप नेतृत्व महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडमध्ये या राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील सोबत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या माहितीच्या आधारावर प्रसिद्घ केले आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास पक्षाला मोठा फायद्या होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील श्रेष्ठींचे म्हणणे आहे. तशी तयारी करण्याचे आदेश संबंधित राज्यातील नेत्यांना देण्यात आल्याचेही समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील पक्ष नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करणेच योग्य राहील. मात्र पक्षातील एका गटाच्या म्हणण्यानुसार दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दोन्ही गटांची मते जाणून घेतल्याचे समजते. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतो. तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ हा डिसेंबरमध्ये संपतो. तेव्हा या तीन राज्यांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या की कार्यकाळ पूर्ण होऊ द्यायचा याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेच घेतील असे सांगण्यात येते आहे.




























































