निवडणूक कामामुळे सहकार विभागाचे काम होणार ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणूक कामामुळे मुंबईत सहाकार विभागाचे काम ठप्प होणार आहे. सहनिबंधक कार्यालयांतर्गत कर्मचाऱयांची 255 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 85 पदे वर्षनुवर्षे रिक्त आहेत. तर उर्वरित 170 पैकी 125 हून अधिक अधिकारी, कर्मचाऱयांना निवडणूक कामाला लावले आहे. त्यामुळे प्रशिक्षण, पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष मतदान काळात सहकार विभागाची कार्यालये सुरू राहणार असली तरी कामकाज होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

मुंबईत 29 हजार सहकारी संस्था आहेत. त्यांच्या कारभारावर सहनिबंधक कार्यालयांतर्गत चार जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालये आणि 32 वॉर्ड कार्यालये कार्यतर आहेत. येथे सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सभासदांबरोबरच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर रीतसर सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढणे, संस्थांची तपासणी करणे, निवडणूक घेण्याचे काम केले जाते. त्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये 255 पदे मंजूर आहेत, मात्र 85 पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने आहे त्याच कर्मचाऱयांमध्ये काम केले जात आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांपसून 14 कर्मचारी निवडणूक डय़ुटीवर गेले आहेत, तर इतर 125 कर्मचाऱयांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केल्याचे पात्र जिल्हाधिकाऱयांनी दिले आहे.

170 कर्मचाऱयांपैकी 125 जणांना निवडणूक डय़ुटी

कार्यालय               निवडणूक डय़ुटी लागलेले कर्मचारी
सहनिबंधक कार्यालय       22
डीडीआर-1                 35
डीडीआर-2                 24
डीडीआर-3                18
डीडीआर-4                 12

संबंधित कर्मचाऱयांना 18 आणि 19 एप्रिल रोजी प्रशिक्षण आणि पूर्वतयारीसाठी जावे लागणार आहे. तसेच मुंबईतील मतदानासाठी 27 ते 29 एप्रिलदरम्यान निवडणूक काम असणार आहे. त्यामुळे या कालावधीत सर्वच सहकार विभागाचे काम थांबणार आहे.