
राज्यात 18 महापालिकांची मुदत डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान संपत आहे. या महापालिकांच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. त्यामुळे त्यानुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने या महापालिकांना आज दिले आहेत.
मुंबईत यापूर्वीही एकसदस्यीय प्रभाग रचना होती. मात्र अन्य महापालिकांमध्ये दोन, तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती आणि या रचनेचा फायदा भाजपला होईल असा अंदाज बांधून ती रचना करण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकसदस्यीय रचनेच्या आधारे महापालिका निवडणुका घेण्याचे ठरले. अधिनियमात तशी सुधारणादेखील करण्यात आली होती. त्या आधारे आता राज्य निवडणूक आयोगाने एकल प्रभागांची रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे ही रचना करण्यात येणार आहे.
या महापालिकांत होणार निवडणुका
मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.


























































