काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तफावत; 48 तासात खुलासा करण्याची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे. याबाबत त्यांना 48 तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या 10 उमेदवारांचया निवडणूक खर्चाबाबतची पहिली तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. डी. प्रवीण यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच उमेदवार उपस्थित होते.

निवडणूक खर्च समितीचे प्रमुख रत्नराज जवळगेकर, जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिशन राऊत, यांच्या सर्व सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक यांनी उमेदवाराच्या खर्चाच्या तपासणीची कार्यवाही केली. यावेळी काही उमेदवारांचा निवडणूक खर्च व खर्च समितीच्या दरानुसार त्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत आल्याने काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत आणि भाजपा उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना त्याबाबतचा खुलासा 48 तासात करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जवळगेकर यांनी दिली आहे. उमेदवाराला देण्यात आलेली खर्च नोंदवही, कॅश व बँक नोंदवहीतील नोंदी व एसएसटी व एफएसटी टीमच्या चित्रीकरणानुसार खर्च समितीकडील शॅडो नोंदवहीत उमेदवारांचा नोंदणी केलेला दरपत्रकानुसार खर्च यात तफावत आल्याने संबंधित उमेदवारांकडून खुलासा मागवण्यात येत असून निवडणूक निरीक्षक (खर्च ) यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समिती यावर अंतिम निर्णय घेईल, असे जवळगेकर यांनी सांगितले.

उमेदवारांनी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार त्यांना देण्यात आलेल्या नोंदवहीत खर्च नोंदविणे आवश्यक असल्याचे निरीक्षकांनी सांगितले. तसेच उमेदवाराच्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद काटेकोरपणे घेण्याचे निर्देश सर्व सहाय्यक निवडणूक निरीक्षक (खर्च ) व खर्च समितीने अधिकाऱ्यांना दिले आहेत.