उमेदवाराच्या खर्चात तफावत; नितीन गडकरी, राजू पारवे यांना निवडणूक विभागाची नोटीस

नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आणि रामटेक मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे, काँग्रेस उमेदवार शाम बर्वे यांना निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे.

निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिह्यात तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. नागपूर जिह्यातील तक्रार समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आहेत. नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांनी दुसऱया टप्प्यातील खर्चाची माहिती बुधवारी सादर केली. यात भाजपचे नितीन गडकरी व कॉँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या खर्चात प्रशासनाला तफावत आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी याआधी सादर केलेल्या खर्चातही तफावत आढळली होती.

रामटेकचे शिंदे गटाचे राजू पारवे यांनी 9 लाख 93 हजार 97 रुपयांचा खर्च दाखवला. प्रशासनाच्या अंदाजानुसार त्यांनी 21 लाख 13 हजार 960 रुपयांचा खर्च केला आहे. कॉँग्रेसचे श्याम बर्वे यांनी 15 लाख 83 हजार 178 रुपयांचा खर्च दाखवला. प्रशासनाच्या मते त्यांनी 18 लाख 67 हजार 484 रुपयांचा खर्च केला. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.