अवघ्या 10 रुपयात ‘ही’ सायकल 150 किमी धावणार, आनंद महिंद्राही झाले ‘देशी जुगाड’चे फॅन

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम प्रेरणादायी व्हिडीओ, मेसेज शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. एका तरुणाने सहा सिटर इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. सायकलचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही ‘देशी जुगाड’चे फॅन झाले आहेत. विशेष म्हणजे ही सायकल 10 रुपयात 150 किमी धावणार आहे.

व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी इलेक्ट्रिक मल्टी रायडर प्रवासी वाहनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही सहा आसनी सायकल हिंदुस्थानातील एका गावातील तरुणाने बनवली आहे. देशात बनलेल्या या सायकलचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लिहीलेय की, काही बदल करुन या सायकलला जागतिक स्तरावर नेले जाऊ शकतो. युरोपच्या गर्दीत या सायकलला टूरिस्ट स्पॉटवर टूर बससारखा वापर केला जाऊ शकतो. ग्रामीण भागातील अशाप्रकारच्या कल्पना पाहून मी भारावून जात असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आतापर्यंत 7 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 37 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

या व्हिडीओमध्ये तरुणाने दावा केला आहे की, या वाहनाची किंमत 10 ते 12 हजार रुपये आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल 150 किमी चालू शकते. या इलेक्ट्रिक सायकलला केवळ 10 रुपयात चार्ज केले जाऊ शकते, असा दावाही तरुणाने केला आहे.

दरम्यान, तरुणाची ही कल्पकता पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत आणि काहींना याला येत्या काळात गेम चेंजर म्हणून संबोधले आहे. एका युजरने यावर लिहीलेय की, प्राणीसंग्रहालय, उद्यान, कॉर्पोरेट क्षेत्राजवळ ही चांगली संकल्पना आहे. एका अन्य युजरने लिहीलेय, मी अशा छोट्या-मोठ्या इंजिनीअर्सचे कौतुक करतो. तर अन्य एका युजरने लिहीलेय, हे ग्रामीण क्षेत्रातील महिलांसाठी अद्भुत आविष्कार आहे ज्या पाण्यासाठी लांब पल्ला गाठून जातात.