सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन लागू करा, विद्यापीठ कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित संरचना लागू करा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित केलेले शासन निर्णयान्वये रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करा आदी मागण्यांसाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे यांना निवेदन दिले आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा महासंघाने दिला आहे.

दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी 10 ते 12 जूनला काळय़ा फिती लावून काम करणार आहेत. 13 जूनपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर, तर 18 जूनला विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण मुंबई यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 29 जूनला महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल, अशी माहिती एसएनडीटी महिला विद्यापीठ शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रमेश सावंत आणि महासचिव यशवंत गावडे यांनी दिली.