प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे; तीस प्रसूतिगृहांत स्टाफ स्किलचे प्रशिक्षण

पालिकेच्या प्रसूतिगृहातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे धडे’ देण्यात येत आहेत. पालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा ‘सॉफ्ट स्किल’ उपक्रम राबवण्यात येत आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण 42 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून अशा प्रकारचे एकूण 58 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या सूचनेनुसार आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हा संपर्काचा पहिला घटक आहे.  आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सहानुभूतीपूर्ण वृत्ती निश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

असा राबवणार उपक्रम

पालिकेची एकूण 30 प्रसूतिगृहे असून वर्षाला साधारणतः 17 हजार प्रसूती होतात. तर 8 हजार 600 शस्त्रक्रिया, 5 लाख 28 हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सुमारे 1 हजार 800 आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.