दर रविवारी प्रदर्शित करता येणार फिल्म्स; नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्याकडे उत्तमोत्तम डॉक्युमेंटरी फिल्म्सचा खजिना आहे, परंतु  त्यांना थिएटर्स मिळत नाहीत. त्यामुळे चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत. परंतु आता दर रविवारी डॉक्युमेंटरी फिल्म्स प्रदर्शित करता येणार आहेत. या फिल्म्ससाठी राज्यात थिएटर्स उपलब्ध करून देण्यात येतील.राज्यात प्रत्येक थिएटर्समध्ये आठवडय़ातील एक दिवस या फिल्म्ससाठी देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्र्यांनी केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजन आणि भारतीय डॉक्युमेंटरी निर्मिती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘क्षितिज’ या डॉक्युमेंटरी फिल्म क्लबचे उद्घाटन शुक्रवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. डॉक्युमेंटरी फिल्मसाठी अनेक विषय असल्याचेही ते म्हणाले, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सरकार त्यांची मदत करेल. तसेच त्यांना थिएटर्स उपलब्ध करून देईल असेही सागर म्हणाले. यावेळी ‘सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स’ या डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन करण्यात आले. अजय आणि विजय बेदी यांनी ही डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली आहे.

प्रेक्षक आणि कलाकारांचीही कमतरता

आमच्याकडे डॉक्युमेंटरी फिल्मसाठी अनेक उत्तम विषय आहेत, परंतु अशा फिल्म्समध्ये काम करण्यासाठी कलाकार आणि अशा फिल्म्स पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही कमतरता असल्याचे भारतीय लघुपट निर्माता संघटनेच्या अध्यक्षा उषा देशपांडे म्हणाल्या. तर डॉक्युमेंटरी फिल्म्ससाठी डीजिटल माध्यम उपलब्ध असल्याचे फिल्म डिव्हिजनचे महासंचालक प्रथांत फाथ्रबे यांनी सांगितले. थिएटर्समध्ये अशा फिल्म्ससाठी तारखा मिळत नाहीत. कारण थिएटर्सना महसूल वाढवण्यात रस आहे. अशा फिल्म्ससाठी प्रेक्षकच येत नसल्याचेही ते म्हणाले.

  • दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी फिल्म डिव्हिजन संकुलात डॉक्युमेंटरी फिल्म्स दाखवण्यात येणार असून या फिल्म्सच्या दिग्दर्शकांबरोबर प्रेक्षकांना गप्पाही मारता येणार आहेत. त्यांना प्रश्नही विचारता येणार आहेत.