
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांच्यासह असंख्य क्रिकेटपटूंना घडवणारे गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाकडून ऍकॅडमी उभारण्यात यावी अशा प्रकारची मागणी माजी खासदार मोहन रावले यांनी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांना पत्राद्वारे केली आहे. रमाकांत आचरेकर यांची स्मृती जपण्याकरिता महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचलायला हवे. सचिन तेंडुलकरसारखे दिग्गज या ऍकॅडमीत युवकांना मार्गदर्शन करू शकतील. तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्तीही सुरू करावी. वानखेडे स्टेडियममधील एका स्टॅण्डला त्यांचे नावही देण्यात यावे असे रावले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

























































